Belagavi

कन्नड संस्कृती टिकविण्यात मठांचे अनमोल योगदान : खास. शेट्टर

Share

कर्नाटक राज्यात बेळगाव शहराला विशेष महत्त्व आहे. बेळगावात कन्नड संस्कृती टिकवून ठेवण्यात आणि वाढविण्यात मठांचे योगदान अद्वितीय आहे, असे मत खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले.

बेळगाव कारंजी मठाच्या २६ व्या वार्षिकोत्सव कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, बेळगावात मठांनी शांतपणे कन्नड घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. परिणामी, आज मराठी आणि कन्नड दोन्ही भाषिक लोक सामंजस्याने जीवन जगत आहेत. यावेळी त्यांनी बेळगाव राज्याची दुसरी राजधानी व्हावे आणि येथे वर्षातून दोनदा तरी विधानसभा अधिवेशन भरवावे, अशी इच्छा व्यक्त केली.

होसूर मडीवाळेश्वर मठाचे श्री गंगाधर स्वामीजी बोलताना म्हणाले की, आज भौतिक वासनांच्या मागे लागून संबंध तुटले आहेत आणि कुटुंबातील कलह वाढले आहेत. यावर अध्यात्म हाच एकमेव मार्ग आहे. अशा प्रकारे अध्यात्मिक मार्ग दाखवणाऱ्या कारंजी मठासारख्या पीठांची सेवा महत्त्वाची आहे.

निडसोसी श्री डॉ. पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी यांनी सांगितले की, आज सत्पथावर चालणारी युवा पिढी रुळावरून घसरलेल्या रेल्वेसारखी झाली आहे. त्यांना योग्य मार्गदर्शनाची कमतरता असल्याने आपली युवा शक्ती अधोगतीकडे जात आहे. यासाठी धर्मश्रद्धेची गरज आहे.

कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी बोलताना म्हणाले की, गेल्या २६ वर्षांपासून बेळगाव शहरात धर्मजागृतीसाठी शिवानुभव कार्यक्रमाद्वारे कारंजी मठ कार्यरत आहे. वीरेश हिरेमठ यांनी पाच दिवस भव्य भारत-दिव्य परंपरा या विषयावर प्रवचन दिले आणि समारोपीय भाषण केले.

शेगुणसी विरक्तमठाचे डॉ. महांतप्रभू स्वामीजी आणि उत्तराधिकारी श्री शिवयोगीदेवरू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुमारेश्वर संगीत पाठशाळेच्या मुलांनी वचन संगीत कार्यक्रम सादर केला. प्रो. श्रीकांत शानवाड यांनी स्वागत केले, ए.के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर व्ही.के. पाटील यांनी आभार मानले.

Tags: