Hukkeri

सरकारच्या कृषी मूल्य आयोगानुसार उसाला दर द्या; दुंडनगौडा पाटील यांची मागणी

Share

 

सरकारच्या कृषी मूल्य निर्धारण धोरण आयोगाच्या शिफारशीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३,७०० रुपये दर मिळाला पाहिजे, अशी मागणी चिकोडी जिल्हा भारतीय कृषिक समाजाचे अध्यक्ष दुंडनगौडा पाटील यांनी केली आहे.

हुक्केरी शहरात ऊस उत्पादक संघ, कर्नाटक राज्य शेतकरी संघटना, हरित सेना, हमाल कामगार हितसंबंध संघ, शेतकरी हितरक्षण वेदी आणि विविध शेतकरी समर्थक संघटनांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू राहिले. शेतकऱ्यांनी रात्रभर रस्त्यावर झोपून आपला निषेध व्यक्त केला.

आजही शहरात राज्य परिवहन मंडळाच्या बस रस्त्यावर उतरल्या नाहीत; केवळ खासगी वाहनेच धावत होती.

चिकोडी जिल्हा कृषिक समाजाचे अध्यक्ष दुंडनगौडा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. “राज्य सरकारच्या कृषी मूल्य निर्धारण धोरण आयोगाचे अध्यक्ष अशोक दळवाई यांनी नुकत्याच धारवाडमध्ये झालेल्या कार्यशाळेत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गणिती आकडेवारीनुसार प्रति टन ₹३,७०० दर देण्याची शिफारस आयोगाने केली असल्याचे सांगितले आहे. मात्र, आयोगाच्या शिफारशीनुसार आदेश काढण्यास सरकार बांधिल नाही, त्यामुळे हे आंदोलन अजूनही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर हजारो शेतकऱ्यांनी शहरातून रॅली काढली. या रॅलीमध्ये हुक्केरी वकील संघटनेच्या सदस्यांनीही भाग घेऊन आपला पाठिंबा दर्शविला.

यावेळी ऍड. रामचंद्र जोशी, नगरपरिषद अध्यक्ष इम्रान मोमिन, ए. के. पाटील, तम्मणगौडा पाटील, शांतीनाथ मगदुम, भीमगौडा पाटील, प्रभू वंटमूरी, गोपाळ मरबसनवर, जियाउल वंटमूरी, विश्वनाथ नाईक, महम्मद अली बाडकर, गुरु मडिवाळ आदी उपस्थित होते.

Tags: