





कर्नाटकातील महिला आणि महिला व बाल विकास विभागाला अधिकाधिक बळकट करून आपल्या विभागाला क्रमांक एकवर घेऊन जाण्याचे ध्येय आहे, असे महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

१९ नोव्हेंबर रोजी कण्ठीरवा स्टेडिअममध्ये होणाऱ्या आयसीडीएसच्या अंगणवाडी सुवर्ण महोत्सवाच्या, अक्का पदे म्हणजेच महिला सुरक्षा पथकाच्या लोकार्पणाच्या आणि गृहलक्ष्मी बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित राज्यस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. या तिन्ही महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांच्या यशासाठी सर्वांनी हातावर हात घालून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी गृहलक्ष्मी योजनेच्या धर्तीवर सुरू होत असलेल्या गृहलक्ष्मी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीला जनमान्यता मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. या सोसायटीमार्फत लाभार्थ्यांना तीन लाखांपर्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच, महिलांना अधिक सुरक्षितता देण्यासाठी ‘अक्का पदे’ लवकरच राज्यभर सुरू करण्यात येत आहे. होमगार्ड्स आणि एनसीसी विद्यार्थी या पथकात राहून सार्वजनिक ठिकाणी गस्त घालतील, ज्यामुळे महिलांवरील डीप फेक हल्ले आणि इतर धोके कमी होतील. पुढील तीन महिन्यांत जिल्हा स्तरावर गृहलक्ष्मी सोसायटीचा विस्तार केला जाईल आणि ‘अक्का पदे’ घरोघरी जाऊन जागृती करेल, अशी माहिती त्यांनी दिली.
मंत्री हेब्बाळकर यांनी अंगणवाडी केंद्रांमध्ये सुरू झालेल्या एलकेजी आणि यूकेजी वर्गांमध्ये जास्तीत जास्त मुलांचे प्रवेश व्हावेत, यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे सहकार्य आवश्यक असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाला बेंगळुरूच्या जवळच्या आठ जिल्ह्यांमधून ४० हजारांहून अधिक महिला उपस्थित राहण्याची अपेक्षा असून, इंदिरा गांधी जयंतीदिनी आयोजित या कार्यक्रमांच्या तयारीमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित उपसंचालक आणि अधिकाऱ्यांना दिले.


Recent Comments