Belagavi

आरएलएस महाविद्यालयात जिमखाना संघटनेचे उद्घाटन

Share

बेळगाव येथील के. एल. एस. संस्थेच्या राजा लखमगौडा विधी महाविद्यालयात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीच्या जिमखाना संघटनेचे उद्घाटन आज करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव संतोष कामगौड उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना व्यवसायासंबंधी मार्गदर्शन केले. “कायदेविषयक विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक नीती अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी याचे पालन करावे आणि आपल्या कामाबद्दल आस्था व सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा,” असे त्यांनी म्हटले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष ऍड. आर. एस. मुतालिक यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन कौशल्याचे महत्त्व समजावून सांगितले, तसेच कायदे क्षेत्रातील व्यावसायिक संधींवर प्रकाश टाकला.

जिमखाना संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. प्रसन्नकुमार यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि महाविद्यालयाच्या महत्त्वाच्या कामगिरीचा उल्लेख केला. सहायक शारीरिक संचालक अमित बी. जाधव यांनी समितीच्या सदस्यांना शपथ दिली. यावेळी प्राचार्य डॉ. एच. एच. हवालदार, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: