बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील चार संचालक पदांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये रमेश कत्ती, अण्णासाहेब जोल्ले, नानासाहेब पाटील आणि महांतेश दोड्डगौडर यांची निवड झाली आहे.
बँकेच्या एकूण १६ जागांपैकी ९ जागांवर यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित सात जागांसाठी निवडणूक झाली होती, त्यापैकी तीन जागांचे निकाल अगोदरच जाहीर झाले होते. आता उर्वरित चार जागांचे निकालही जाहीर झाले असून, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील गटाने १३ जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे.
या विजयानंतर आमदार भालचंद्र जारकीहोळी गटाचे सदस्यच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतील यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे आता कर्नाटकचे लक्ष बेळगाव डीसीसी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाकडे लागले आहे. भालचंद्र जारकीहोळी यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे की, अध्यक्षपदी लिंगायत समाजातील व्यक्तीचीच निवड होईल. सध्या अध्यक्षपदासाठी अण्णासाहेब जोल्ले आणि महांतेश दोड्डगौडर यांच्यात तीव्र स्पर्धा आहे.
महांतेश दोड्डगौडर यांनी बेळगाव डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आपण प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट केले. “मी अनेक वर्षांपासून बेळगाव डीसीसी बँकेत योगदान देत आलो आहे. मला सर्व संचालक मंडळावर विश्वास आहे. नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाला मी बांधील राहीन,” असे त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, “बेळगाव डीसीसी बँकेच्या १६ ही संचालकांना अध्यक्ष-उपाध्यक्ष होण्याची इच्छा असतेच. माझ्या सेवेचा विचार करून बेळगाव डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदासाठी माझी निवड होईल, अशी माझी अपेक्षा आहे.” राजकीय विषयावर बोलताना त्यांनी, आगामी २०२८ च्या कित्तूर मतदारसंघातील निवडणुकीत निश्चितपणे भाजपचा झेंडा फडकवू, असा विश्वास व्यक्त केला.


Recent Comments