कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष पी. एम. नरेंद्रस्वामी यांनी, ‘नोव्हेंबर क्रांती’च्या चर्चा फेटाळून लावत केवळ ‘शांतता’ राखण्यावर भर दिला आहे. मंत्रीपदाच्या चर्चेवर भाष्य करणे त्यांनी स्पष्टपणे टाळले. तसेच, राहुल गांधी यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या वक्तव्यांना खास शैलीत उत्तर दिले.

बागलकोट येथे बोलताना नरेंद्रस्वामी यांनी, सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या चर्चांवर टिप्पणी करताना “नोव्हेंबर क्रांती काही नाही, फक्त शांती आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. आमदार जे. टी. पाटील यांनी केलेल्या ‘नरेंद्रस्वामी यांना मंत्रिपद मिळण्याचे संकेत आहेत,’ या विधानावर बोलण्यास नकार देत, “मी पक्षप्रमुख नाही किंवा मंत्रीही नाही; मी येथे ज्या उद्देशाने आलो, तेवढ्यापुरतेच बोलणे योग्य,” असे त्यांनी म्हटले. दरम्यान, आमदार यत्नाळ यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना, “यत्नाळ हे माझे मित्र असले तरी त्यांनी ‘यत्नाळ’ म्हणूनच राहावे, ‘कित्नाळ’ बनू नये,” असे विधान आपण विधानसभेतही केल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली दौऱ्याबाबत खुलासा करताना त्यांनी सांगितले की, “मी काल राहुल गांधी यांची भेट केवळ त्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी घेतली होती.” भेटीत केवळ पाच मिनिटे त्यांनी आपल्या मंडळाच्या कार्याबद्दल आणि जबाबदारीबद्दल माहिती दिली. तिथे कोणताही राजकीय संवाद झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, ‘नोव्हेंबर क्रांती’ किंवा पक्षाच्या अंतर्गत विषयांवर भाष्य करणे योग्य नाही, कारण ते पक्षाचे विषय आहेत आणि त्या जबाबदारीच्या ठिकाणी आपण नाही, असे मत नरेंद्रस्वामी यांनी व्यक्त करत चर्चेला विराम दिला.

 
			 
 
 
  
					 
				 
						  
						  
						  
						  
						 
						 
						 
Recent Comments