जमिनाचा योग्य मोबदला दोन दिवसांत जमा न केल्यास धरणाचे सुरू असलेले बांधकाम थांबवू, असा स्पष्ट इशारा बेळगाव तालुक्यातील बसुर्ते येथील संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

आज सकाळी शेतकरी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले आणि त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती, पण ती रद्द झाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावात धरण बांधण्यासाठी सुमारे ८० एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र, योग्य नुकसानभरपाई मिळाली नसल्याच्या निषेधार्थ या शेतकऱ्यांनी काल बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून जोरदार निदर्शने केली होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी बैठक बोलावून चर्चा करण्याचे आश्वासन देत, सर्वांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन केले होते. तथापि, जिल्हाधिकारी आज इतर कामकाजात व्यस्त असल्याने बैठक अचानक रद्द करण्यात आली. यामुळे संतापलेल्या बासूरते गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपला तीव्र संताप व्यक्त केला.
उभ्या पिकांवर जेसीबी फिरवून मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेली अनेक शेतकरी कुटुंबे आज रस्त्यावर आली आहेत. कष्ट करून खोदलेल्या विहिरींचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे. काल याचा निषेध करत आंदोलन केले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी आज बैठकीला या असे सांगितले. मात्र आज बैठक नसल्याचे कळल्यावर महिला शेतकऱ्यांनी अश्रू ढाळले.
“जर धरण बांधले, तर आमची गावेसुद्धा उध्वस्त होतील. दोन दिवसांत नुकसानभरपाई दिल्यास धरण बांधण्यास आम्ही संमती देऊ. अन्यथा, काम बंद पाडू. आम्हाला कुठलीही सरकारी नोकरी नाही. आम्ही शेतीवरच अवलंबून आहोत. आमची असलेली जमीनच काढून घेतल्यास आम्ही जगायचे कसे?”, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी बसुर्ते गावातील शेतकरी आणि शेतकरी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments