माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरक्षा रक्षकाच्या खून प्रकरणाचा तपास पूर्ण करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने वार करून खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

महादेव भीमप्पा जोगी (वय ५८) हे सौंदत्ती येथील असून, ते बेळगावात सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. शिवबसव नगरमधील कॉलेजसमोरील क्वार्टर्समध्ये त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. मृताचा मुलगा बसवराज महादेव जोगी यांच्या तक्रारीनुसार, माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बेळगाव एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी आकाश ईरप्पा निप्पाणीकर (वय २८) याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत, आरोपीने दारूच्या नशेत क्षुल्लक वादातून चाकूने हल्ला करून खून केल्याची कबुली दिली. आरोपीला तात्काळ अटक करून, न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यात दाखवलेल्या तत्परतेबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी तपास पथकातील अधिकारी जे. एम. कालिमिर्ची, होनप्पा तळवार, उदय पाटील, पी. एम. मोहिते आणि इतर कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली.


Recent Comments