मेंढपाळांना योग्य संरक्षण द्यावे आणि मेंढ्या चोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी आज मेंढपाळांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले.

आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या शेकडो मेंढपाळांनी मेंढ्यांच्या चोरट्यांपासून संरक्षण देण्याची आणि या चोरट्यांविरुद्ध कठोर कायदेशीर पाऊले उचलण्याची मागणी केली.
यावेळी आंदोलकांनी त्यांच्या व्यथा आणि मागण्यांचा आढावा घेताना सांगितले, “आम्ही पूर्वीपासून मेंढ्या पाळत आलो आहोत, पण वारंवार मेंढ्यांच्या वाड्यांमधून मेंढ्यांची चोरी होत आहे. याबाबत तक्रारी केल्या जातात, चोरट्यांना पकडले जाते, पण त्यांच्यावर कठोर कारवाई न करता त्यांना सोडून दिले जाते. डोंगरावर मेंढ्या चारण्यासाठी गेल्यास वन विभागाचे असहकार्य, तर वस्तीत मेंढ्या पाळल्यास चोरट्यांचा त्रास आहे. याशिवाय पावसाची अवकृपाही आहे. सरकारने मेंढपाळांना योग्य सुविधा आणि संरक्षण पुरवावे. अन्यथा, आम्ही आमच्या सर्व मेंढ्या व जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊ आणि तुम्हीच त्यांना चारा व आम्हाला जेवण द्यावे.”
रात्रीच्या वेळी संधी साधून चोरटे मेंढ्यांची चोरी करत आहेत. वर्षाला सुमारे ३ ते ४ हजार मेंढ्या गायब होत आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यास, ते पुराव्याची मागणी करतात. “मेंढ्या चोरणाऱ्यांना बंदुका देण्यात आल्या आहेत, पण चालवण्याचा हक्क नाही.” नंदगडमध्ये दोन चोर सापडले आहेत, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शेकडो मेंढपाळ आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments