१ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये कर्नाटक राज्योत्सव शांततापूर्ण वातावरणात पूर्ण करण्यासाठी बेळगाव पोलिस खाते सज्ज झाले आहे. या संदर्भात कोणकोणती पाऊले उचलली जात आहेत, याची माहिती शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे.

राज्योत्सव मिरवणुकीसाठी १८० अधिकारी, २,३०० कर्मचारी, ४०० होमगार्ड्स, १० के.एस.आर.पी. तुकड्या, ८ सशस्त्र राखीव तुकड्या आणि १० ड्रोन बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. सरदार मैदान, सी.पी.एड मैदान, महिला पोलिस ठाण्यामागील मैदान आणि कोर्ट कॉम्प्लेक्स पार्किंगची जागा सार्वजनिक वाहनांच्या पार्किंगसाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. अवजड वाहनांना १ नोव्हेंबर रोजी प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. राज्योत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी राणी चेन्नम्मा चौकात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. रात्री १० नंतर ‘लाऊड म्युझिक’ वापरू नये, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची सूचना सर्व आयोजकांना देण्यात आली आहे. ‘प्लाझ्मा म्युझिक सिस्टिम’ आणि ‘लेझर लाईट’चा वापर पूर्णपणे निषिद्ध करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त, राज्योत्सवाचे चित्ररथ राणी चन्नम्मा चौकात केवळ १० मिनिटे थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे. मिरवणुकीत महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यांना त्रास होईल असा मोठा आवाज असलेली साउंड सिस्टीम वापरू नये. मिरवणुकीत पोलिस विभागाचे ‘गुंडा विरोधी पथक’ आणि ‘मद्यपान व मादक द्रव्य तपासणी पथक’ तैनात करण्यात आले आहे. मद्यपान करून, मादक पदार्थांचे सेवन करून सणाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास, कठोर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत पोलीस आयुक्तांनी कडक इशारा दिला आहे.


Recent Comments