महात्मा गांधीजी हे आपले राष्ट्रपिता असून, त्यांनी या पावन भूमीवर संचार करून स्वातंत्र्याची बीजे पेरली. कन्नड आणि मराठी भाषिक लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज भाषा आणि सीमावादासाठी बेळगावला लक्ष्य करणे योग्य नाही, असे मत जिल्हा कन्नड कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी व्यक्त केले.

कर्नाटक साहित्य अकादमी आणि चकोर साहित्य वेदिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते. १९२४ मध्ये महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकमेव अधिवेशनामुळे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाला निर्णायक दिशा दिली. १९२२ मध्ये गांधीजींना अटक झाल्यानंतर थंडावलेल्या असहकार चळवळीला या अधिवेशनाने पुन्हा बळ दिले. काँग्रेसमधील मतभेद मिटवून स्वराज्यासाठी एकजूट निर्माण करण्यात हे अधिवेशन यशस्वी ठरले असे ते म्हणाले.
अकादमी सदस्य डॉ. मैत्रेयीनी गदिगेप्पगौडर यांनी बेळगावच्या इतिहासातील १९२४ च्या महत्त्वावर जोर दिला. बेळगावचा इतिहास सांगताना त्यांनी १८२४ मध्ये राणी चन्नम्मा यांनी केलेल्या बंडानंतर बरोबर १०० वर्षांनी, म्हणजेच १९२४ मध्ये हे ऐतिहासिक अधिवेशन झाल्याचे सांगितले.
एक्सपर्ट शिक्षण संस्थाचे अध्यक्ष नागेश दंडापूरे यांनी बेळगावमध्ये झालेल्या अशा ऐतिहासिक कथा आजच्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा देतात, असे मत व्यक्त केले.
चकोर साहित्य विचार वेदिकेचे जिल्हा संयोजक शिवराज अरळी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन संजीव करवीनकोप्पा, अध्यापक, कन्नड विभाग, एक्सपर्ट पदवीपूर्व महाविद्यालय यांनी केले. महाविद्यालयाचे शिक्षक आणि साहित्यप्रेमी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments