Vijayapura

मंत्रिपदासाठी विजापूरच्या दोन आमदारांची दिल्लीत लॉबिंग

Share

राज्य काँग्रेस सरकारमध्ये ‘सत्ता हस्तांतरणा’च्या चर्चेने नोव्हेंबर महिना जवळ येताच जोर धरला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे मंत्रिपदाचे इच्छुक आणि मंत्रिपद गमावण्याची भीती असलेले नेते हायकमांड स्तरावर तीव्र लॉबिंग करत आहेत.

विजापूर जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ आमदारांनी तर मंत्रिपद मिळवण्यासाठी दिल्लीत तळ ठोकला असून, आपण इच्छुक असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. बबलेश्वरचे आमदार एम.बी. पाटील आणि बसवन बागेवाडीचे आमदार शिवानंद पाटील. दोघांनीही दिलेले खाते यशस्वीपणे सांभाळले आहे. मात्र, अलीकडेच मंत्रिमंडळाच्या ‘परीक्षेत’ मंत्री शिवानंद पाटील यांना अपयश आल्याच्या चर्चा आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवानंद पाटील यांना वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंडिचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी मंत्रिपदासाठी थेट दिल्लीत तळ ठोकला आहे. सध्या निगम मंडळाचे अध्यक्ष असलेले अप्पाजी नाडगौडा यांच्या संभाव्य दावेदरीला त्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. “निगम मंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यावर पुन्हा मंत्रिपद मागणे योग्य नाही,” असे सांगत पाटील यांनी नाडगौडा यांच्या हक्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, “इंडी मतदारसंघाला आजपर्यंत मंत्रिपद मिळालेले नाही, त्यामुळे पक्षाने दिलेले आश्वासन पाळून मंत्रिमंडळ फेररचनेत मला स्थान द्यावे,” अशी मागणी यशवंतरायगौडा पाटील यांनी हायकमांडकडे केली आहे.

दुसरीकडे, मुद्देबिहाळचे आमदार अप्पाजी नाडगौडा यांनीही मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. ‘मी सुद्धा मंत्रिपदाचा इच्छुक आहे,’ असे सांगत त्यांनी यशवंतरायगौडा पाटील यांच्या संभाव्य मार्गात अडथळा आणला आहे. नाडगौडा म्हणाले, “मी सहा वेळा आमदार असूनही कधीही मंत्रिपद मागितले नव्हते. माझे ज्येष्ठत्व लक्षात घेऊन मंत्रिपद दिल्यास मतदारसंघाचा विकास होईल.” त्यांनी कोणताच दबाव आणला नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी पडद्याआड त्यांची तयारी सुरू आहे.

एकंदरीत, हे दोन्ही ज्येष्ठ आमदार मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आधीच दोन मंत्रिपदे असलेल्या विजापूर जिल्ह्याला काँग्रेस हायकमांड तिसरे मंत्रिपद देणार की, विद्यमान मंत्र्यांपैकी एकाला वगळून या दोघांपैकी एकाला मंत्रिमंडळात घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Tags: