Belagavi

बेळगावात विवाहितेचा संशयास्पद मृत्यूने खळबळ

Share

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बेळगाव येथील कलखांब येथे घडली असून, सासरच्या मंडळींनीच तिचा खून केल्याचा संशय मृत तरुणीच्या माहेरच्या कुटुंबाने व्यक्त केला आहे.

बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड येथील शीतल या तरुणीचा विवाह कलखांब गावच्या राजू नायक यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला अडीच वर्षांचे आणि सहा महिन्यांचे अशी दोन अपत्ये आहेत. मात्र, शीतलचा पती राजू तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार त्रास देत होता, तसेच त्यांच्यात सतत भांडणे होत होती, असा तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. काल सकाळी व्यवस्थित बोललेली तरुणी रात्री मृत अवस्थेत आढळली असून, तिचा मृतदेह सोडून सासरचे सर्व लोक पसार झाले असल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मृत तरुणीची बहीण ईरव्वा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सकाळी फोन केला असता, सर्वकाही व्यवस्थित असल्याचे शीतलने सांगितले होते, पण तिचा पती सतत तिच्यावर संशय घेत होता. मागील वेळेस भांडण झाल्यावर आम्ही तिला समजावून सांगितले होते. आज ही घटना घडली असून, रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिच्यासोबत सासरचे कोणीच नव्हते. जर त्यांनी काही केले नसेल तर ते रुग्णालयात का आले नाहीत, असा सवाल उपस्थित करत आपल्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा.” अशी मागणी ईरव्वा यांनी केली.

मृत तरुणीचे नातेवाईक शंकर दुर्गप्पा अंकलगी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, रात्री ९:३० च्या सुमारास अचानक फोन आला आणि शीतलचा मृत्यू झाल्याचे समजले. घरातील कोणीही उपस्थित नसताना तिचा मृतदेह सोडून ते निघून गेले. सासरच्या लोकांनीच तिला मारहाण करून संपवले असावे,” असा संशय त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहासमोर कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला होता.

Tags: