खासगी ट्रस्टशी संबंधित विजापूर येथील पन्नासहून अधिक मंदिरांच्या मालमत्तेच्या नोंदीमध्ये ‘मुजराई’ विभाग म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आणि निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी मंत्री पट्टणशेट्टी म्हणाले की, विविध खासगी ट्रस्ट आणि समित्यांच्या मालकीची मंदिरे मुजराई विभागाने आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. मंदिरांशी संबंधित मालमत्ता ‘मुजराई विभाग’ म्हणून उताऱ्यांमध्ये नोंदवण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, जी योग्य कार्यवाही नाही. तसेच, विजापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक मंदिरांसंदर्भात तहसीलदारांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना या खासगी मंदिरांच्या मालमत्तेवर ‘हिंदू धार्मिक आणि धर्मदाय संस्था विभाग, कर्नाटक सरकार’ असे नमूद करण्याची सूचना केल्याचे उघड झाले आहे.
“ही सर्व मंदिरे खासगी मंदिरे म्हणून प्रसिद्ध आहेत. ही सर्व मंदिरे ट्रस्टच्या माध्यमातून व्यवस्थापित केली जातात आणि त्यांना सरकारकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. हे सर्व माहीत असूनही, वैयक्तिक स्वार्थातून मंदिरांची खासगी मालमत्ता हिंदू धार्मिक आणि धर्मदाय विभागाच्या अखत्यारीत आणून मंदिराच्या मालकांना त्रास देण्याचे आणि त्यांची मालमत्ता हडप करण्याचे षडयंत्र रचले जात आहे,” असा गंभीर आरोप माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी केला.
यावेळी व्हीडीएचे माजी अध्यक्ष भीमशंकर हदनूर, माजी उपमहापौर गोपाळ घाटकामळे, ईरण्णा पट्टणशेट्टी, प्रभाकर भोसले, विजय कोरळ्ळी , रवी कल्लूर, बसवराज तोनश्याळ, राजू बिरादार, संदीप पाटील, जगदीश मुचंडी आदी उपस्थित होते.


Recent Comments