Kagawad

कागवाड-मोळवाड रस्ता मागणीसाठी शेतकऱ्यांचे नगर पंचायतीसमोर धरणे

Share

देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. याच मूलभूत सुविधांच्या आणि दळणवळणाच्या मागणीसाठी कागवाड येथील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी सरकारी रस्ता बांधावा या मागणीकरिता नगर पंचायतीसमोर सोमवारपासून धरणे सत्याग्रह सुरू केला आहे.

शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती देताना ज्येष्ठ समाजसेवक अरुण जोशी म्हणाले की, कागवाड आणि मोळवाड गावांच्या दरम्यान असलेल्या शेडबाळ गावापर्यंतचा ३ किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्याचे सॅटेलाईट सर्वेक्षण करून तो त्वरित बांधण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या रस्त्यासाठी आमदार राजू कागे यांनी यापूर्वीच निधी दिला असून काम सुरू केले आहे, मात्र गावातील रस्त्याचे सर्वेक्षण झालेले नाही. ते सर्वेक्षण त्वरित पूर्ण करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

या मार्गावर अनेक शेतकरी कुटुंबे असून त्यांनी हजारो टन ऊस पिकवला आहे, परंतु वाहतुकीसाठी रस्ता नसल्यामुळे मोठी अडचण येत आहे. मुलांना शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात मोठे कष्ट सोसावे लागले. अनेकदा कुटुंबातील सदस्य आजारी असताना रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकली नाही. यामुळे त्यांची दैनंदिन कामे थांबली आहेत. इतकेच नाही, तर या रस्त्याच्या समस्येमुळे अनेक कुटुंबातील मुला-मुलींची लग्ने मोडल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

घटनास्थळी कागवाडचे तहसीलदार रवींद्र हादिमणी आणि आमदार राजू कागे यांनी भेट दिली. त्यांनी रस्ते बांधकाम त्वरित सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या सत्याग्रहाला स्थानिक करवे कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रमुख आणि शेतकरी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

या धरणे सत्याग्रहात शेतकरी नेते सचिन मालगोंवे, रमेश राजपूत, बाळू पाटील, प्रवीण कवठगे, मनोज गुरव, शांतिनाथ किणिंगे, अण्णासाहेब पाटील, अरुण जोशी यांच्यासह अनेक शेतकरी नेते सहभागी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्वेक्षण अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

Tags: