Kittur

‘कित्तूर’ उत्सवातील वाद भाषिक नाही; एसपींचे स्पष्टीकरण

Share

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी स्पष्ट केले की, कित्तूर उत्सवात कन्नड गाणी बंद करून हिंदी गायकांना संधी देण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये कोणताही वाद झाला नव्हता. वेळेच्या मर्यादेत कार्यक्रम संपवण्याच्या मुद्द्यावरून हा किरकोळ वाद झाला होता. असे असूनही कोणी भाषिक वादाचा आरोप केल्यास, व्यक्तीशः मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कित्तूर उत्सवाशी संबंधित समाजमाध्यमांवर येत असलेल्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि कल्पित आहेत. त्यांच्यात आणि कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहसंचालक विद्या भजंत्री यांच्यात जो वाद झाला, तो केवळ वेळेच्या मर्यादेमुळे झाला होता. कन्नड किंवा हिंदी गायकांना संधी देण्यावरून तो झाला नव्हता. लोकांची गर्दी लक्षात घेऊन कार्यक्रम नियोजित वेळेत संपवण्याचा प्रयत्न सुरू होता, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी आपण याबाबत स्पष्टीकरण दिले आहे, तरीही कोणी भाषिक वादाचा आरोप केल्यास, व्यक्तीशः मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असे त्यांनी म्हटले.

एसपी गुळेद पुढे म्हणाले “इतर भाषिक कलाकारांना संधी दिली, तरच कोणताही उत्सव राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतो. बाहेरून आलेल्या गायकांनी कित्तूरबद्दल व्यक्त केलेल्या भावना त्याचे साक्षीदार आहेत. कलाकार सांस्कृतिक दूत असतात, त्यामुळे सर्वांना आदर देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या म्हैसूर दसरा आणि हम्पी उत्सवातही इतर कलाकारांना संधी दिली जाते. कित्तूरचा इतिहास देशभर पोहोचवण्यासाठी सर्व भाषेतील लोकांना संधी द्यावी लागते. तीन दिवसांच्या कार्यक्रमात फक्त २ ते ३ परभाषिक कलाकारांना संधी देण्यात आली आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: