hubali

हुबळीमध्ये जुन्या वैमनस्यातून युवकावर चाकू हल्ला

Share

हुबळी शहरात जुन्या वैमनस्यातून एका युवकावर चाकूने हल्ला करून हल्लेखोर पसार झाल्याची घटना घडली आहे.

शहरातील यल्लापूर ओणी येथील अफताब नावाच्या युवकावर पाच जणांच्या टोळक्याने चाकूने वार केले आणि तेथून पळून गेले. यल्लापूर ओणी येथील बुड्डू पान दुकानाजवळ ही घटना घडली असून, जुने वैर या हल्ल्यामागे कारण असावे, असा पोलिसांचा कयास आहे.

काल मध्यरात्रीच्या सुमारास जैयद, तोहिद, चोर फारूक यांच्यासह पाच हल्लेखोर अफताबच्या घरी आले होते आणि त्यांनी त्याला धमकावले होते. या धमकीनंतर अफताब आणि त्याच्या कुटुंबीयांनी आज बेंडिगेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

तक्रार करून सायंकाळी घरी परतत असताना हल्लेखोरांनी अफताबला अडवले. त्याच्या कमरेवर, पाठीवर आणि छातीच्या भागावर चाकूने वार करून ते पळून गेले. अचानक आणि बेछूटपणे चाकू हल्ला करून पसार झालेल्या या पाचही हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गंभीर जखमी झालेल्या अफताबला उपचारासाठी केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags: