खानापूर (ता. 26): खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील मलप्रभा नदीत शुक्रवारी सायंकाळी बुडालेल्या प्रथमेश रवींद्र पाटील (वय 18) या तरुणाचा मृतदेह अखेर आज रविवारी 26 रोजी सकाळी सापडला आहे.

शुक्रवारी सायंकाळी प्रथमेश हा पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या प्रवाहात ओढला जाऊन बुडाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर शनिवारी सकाळपासून खानापूर अग्निशामक दलाचे जवानांनी शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले. तसेच एचइआरएफ (SDRF) रेस्क्यू पथक तसेच स्थानिक युवकांनी मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू केले होते. मात्र दिवसभराच्या प्रयत्नांनंतरही शनिवारी संध्याकाळपर्यंत मृतदेह सापडला नव्हता.
आज, रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सकाळी ग्रामस्थ आणि रेस्क्यू पथक पुन्हा घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा काल शोधण्यात आलेल्या जागेपासून सुमारे शंभर मीटर अंतरावर प्रथमेशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. लगेचच याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेने लोकोळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.


Recent Comments