कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने धारवाड येथील आर. एन. शेट्टी क्रीडांगणावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये यक्षित युवा फाउंडेशनच्या ‘राव्स युवा ॲकॅडमी’च्या युवा खेळाडूंनी लक्षणीय यश संपादन केले आहे.

बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना बेंन्सन इंग्लिश मीडियम स्कूलचा मोहम्मद शफी लतीफशा चांदशाहा याने १४ वर्षांखालील ४१ किलो वजनी गटात आपले कौशल्य आणि खिलाडूवृत्ती सिद्ध करत सुवर्णपदक पटकावले. याच अकादमीची लिटिल स्कॉलर्स ॲकॅडमीची खेळाडू श्राव्या शानभाग हिला कांस्यपदक मिळाले. कर्नाटकभरातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे अनेक जिल्हास्तरीय सुवर्णपदक विजेते या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाले होते.
या विजयासह, मोहम्मद शफीची निवड स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. तो या महिन्याच्या अखेरीस नागालँड येथे होणाऱ्या या स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करेल.
या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक आणि यक्षित युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तायक्वांदो मास्टर श्रीपाद आर. राव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित प्रशिक्षण आणि अमूल्य मार्गदर्शन मिळत आहे.


Recent Comments