“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आएसएस) ब्रिटिशांच्या सोबत होता, म्हणूनच तो स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला नाही,” असा घणाघाती हल्ला विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी केला. विजापूर शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

आएसएसवर नियंत्रण ठेवण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “सरकारने केलेला तो जुना कायदा आहे, कोणताही कार्यक्रम असो, त्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. काही संस्था परवानगी घेत नाहीत. देशात फक्त आएसएस ही एकच संघटना आहे का?” असा प्रश्न एम. बी. पाटील यांनी विचारला.
मंत्री प्रियांका खर्गे यांनी ‘आएसएसवर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’ यासंदर्भात विचारले असता, पाटील म्हणाले, “आएसएस ही नोंदणीकृत नसलेली संस्था आहे. प्रियांका खर्गे जे बोलत आहेत, ते सत्य आहे. नोंदणी नसतानाही त्यांनी मोठे बंगले बांधले आहेत, २००० कोटींची मालमत्ता उभी केली आहे. नोंदणी नसताना काँग्रेसने असे केले तर?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले, “त्सुनामी किंवा भूकंपकाळात फक्त आएसएसनेच काम केलेले नाही, रेड क्रॉसच्या लोकांनीही काम केले आहे. मग आएसएस स्वातंत्र्य लढ्यात का सहभागी झाला नाही?” असा सवाल त्यांनी केला.
सतीश जारकीहोळींविषयी यतींद्र यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देताना मंत्री एम. बी. पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री आणि यतींद्र यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. यतींद्र जे बोलले, त्याचा अर्थ वेगळा होता. माध्यमांनीच ही गोष्ट वाढवून सांगितली आहे. ते स्वाभाविकपणे बोलले होते, हे मोठे करण्याची आवश्यकता नाही.”
‘हिंदूंना तोडण्यात एम. बी. पाटील आघाडीवर आहेत,’ या ईश्वरप्पांच्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले, “ईश्वरप्पांना भाजपने बाहेर काढले आहे. असे बोलतात म्हणूनच त्यांना बाहेर काढले आहे. ते हलके बोलतात, म्हणून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे,” अशा शब्दांत त्यांनी ईश्वरप्पांवर टीकास्त्र सोडले.


Recent Comments