महादेवाची यांची अनेक नावे आहेत. त्यांचे अवतारही विविध आहेत. याच त्रिनेत्राच्या दर्शनासाठी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथून दीक्षीत दाम्पत्याने चारधाम आणि १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाकरिता सायकल यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेदरम्यान आज त्यांनी बेळगाव येथील कपीलश्वराचे दर्शन घेतले.

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथून चारधाम आणि १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी दीक्षीत दाम्पत्याने ही सायकल यात्रा हाती घेतली आहे. आज ते बेळगावात दाखल झाले आणि त्यांनी कपीलश्वराचे दर्शन घेतले. कपीलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने दीक्षीत दाम्पत्याचे अत्यंत आपुलकीने स्वागत करण्यात आले.
या दाम्पत्याने आपल्या निवासस्थानापासून थेट हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, मानागाव, धारीदेवी येथून मथुरा येथे प्रस्थान केले. मथुरेत त्यांनी दीर्घदंड नमस्कार केला. त्यानंतर मध्य प्रदेशाकडे कूच करून उज्जैनच्या महाकाल तसेच खांडव्याच्या ओंकारेश्वर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि लक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले. तेथून आज ते बेळगावातील दक्षिण काशी कपीलेश्वर येथे दाखल झाले.
यात्रेकरू शेखर दीक्षीत यांनी त्यांचे अनुभव कथन केले. त्यांनी म्हटले की, “घरापासून यात्रेला निघालो तेव्हा मनात अनेक आशा आणि भावना होत्या. मात्र, शिवध्यानाच्या जोडीने हाती घेतलेल्या यात्रेने आमच्या मनात परिवर्तन केले आहे. या जगात काहीही शाश्वत नाही आणि कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ बाळगणे योग्य नाही, याची आम्हाला जाणीव झाली आहे. या प्रवासात मुक्काम आणि भुकेल्या पोटाला अन्न मिळवण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शंकरच आम्हाला मदत करत आहेत.”
बेळगावात कपीलश्वराचे दर्शन घेतल्यानंतर दीक्षीत दाम्पत्याची सायकल यात्रा आता रामेश्वराकडे रवाना होणार आहे.


Recent Comments