Accident

हैद्राबाद-बेंगळुरू बसला भीषण आग : २० हुन अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Share

हैद्राबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या एका खासगी बसला आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात भीषण आग लागून, त्यात वीसपेक्षा अधिक प्रवासी जिवंत जळाले आहेत. ही भीषण दुर्घटना आज पहाटेच्या सुमारास कुर्नूल उपनगर, चिन्नाटेकूर येथील राष्ट्रीय महामार्ग ४४ वर घडली.

‘वेमुरी कावेरी ट्रॅव्हल्स’च्या या बसमध्ये दोन चालकांसह एकूण ४३ लोक होते. त्यापैकी ३९ प्रौढ आणि दोन लहान मुलांसह ४१ प्रवासी होते. घटनेत २० हून अधिक लोक जिवंत जळाले असून, १९ प्रवासी जखमी झाले आहेत. आतापर्यंत १९ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती डीआयजी प्रवीण यांनी दिली आहे.

गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना आगीमुळे जाग आली. त्यापैकी काहीजण मदतीसाठी ओरडत, बसचा आपत्कालीन दरवाजा तोडून बाहेर पडले. मात्र, अनेकजण आगीत अडकून करुण पद्धतीने जिवंत जळाले.

माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. जखमींना कुर्नूल येथील जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच बसचा चालक आणि कर्मचारी घटनास्थळावरून पसार झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. बहुतांश प्रवासी हैद्राबाद शहरातील असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, या दुर्घटनेत एका मोटारसायकल स्वाराचाही मृत्यू झाला आहे.

या घटनेसंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पोलीस आयुक्तांना या घटनेची माहिती मिळवण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांमध्ये कर्नाटकातील किती लोक आहेत, हे लवकरच शोधले जाईल,” असे त्यांनी सांगितले.

Tags: