विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरात दिवसाढवळ्या एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अनसुबाई यमनप्पा मादर या महिलेवर तिचा पती यमनप्पा याने हत्येच्या उद्देशाने हल्ला केला. सिंदगी शहरातील आमदारांच्या घरामागील परिसरात ही घटना घडली. अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने कोयत्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला असून हे भयानक दृश्य पाहून नागरिक हादरून गेले आहेत.
पती-पत्नी म्हणून त्यांनी अनेक वर्षे संसार केला, पण कौटुंबिक कलहातून झालेल्या या हल्ल्यामुळे दोघेही रुग्णालयात दाखल आहेत. पत्नीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या पतीवर संतप्त नागरिकांनी हल्ला चढवला. सिंदगी शहरातील आनंद चित्रपटगृहानजीक ही घटना घडली. देवर हिप्परगी तालुक्यातील केरूटागी गावातील यमनप्पा मादर (६०) याने आपल्या पत्नीवर अनसुया मादर (५०) हिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अनसुया गंभीर जखमी झाली आहे.
हल्ला केल्यानंतर यमनप्पा लोकांना धमकावत होता. पत्नीवर हल्ला करत असताना सोडवण्यासाठी आलेल्या लोकांना त्याने कोयता दाखवून दूर राहण्याची धमकी दिली. यावर संतप्त झालेल्या जमावाने यमनप्पावर दगड आणि पाईपने हल्ला केला.
घटनेत कोयत्याने गंभीर जखमी झालेल्या पत्नी अनसुयाची प्रकृती गंभीर असून, तिला सिंदगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकांकडून झालेल्या मारहाणीत यमनप्पाच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून, त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांमध्ये कौटुंबिक कलहातून भांडण झाले होते. अनेक वर्षांपासून पती-पत्नी विभक्त राहात होते आणि आज कोर्टातून परतत असताना पतीने हा जीवघेणा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. सिंदगी पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होईल.
कौटुंबिक वाद कोणतेही असले तरी, या पद्धतीने क्रूर हल्ला करणे योग्य नाही, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.


Recent Comments