माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांचे सुपुत्र चिदानंद सवदी यांनी तीव्र शाब्दिक हल्ला चढवला आहे. “रमेश जारकीहोळी यांच्यात संस्कारांचा अभाव आहे. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना संस्कार दिले नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गुरुवारी अथणी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “रमेश जारकीहोळींना सहाव्या वर्षी दारूची भट्टी राखायला पाठवले होते. तो एक खालच्या स्तराचा राजकारणी आहे,” अशा एकेरी भाषेत त्यांनी जारकीहोळींवर ताशेरे ओढले. रमेश जारकीहोळी यांनी आपल्या कुटुंबाबद्दल हलके आणि वडिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला.
रमेश जारकीहोळी यांनी डिसिसी बँक आणि कृष्णा सहकारी संस्थेचा अवमान केल्याचा आरोप करत चिदानंद सवदी यांनी जारकीहोळींच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ‘घटप्रभा साखर कारखान्याचे नुकसान कोणामुळे झाले? गोकाक गिरणी कोणी बंद पाडली? ज्यामुळे आठ हजार लोक रस्त्यावर आले,’ असे सवाल त्यांनी उपस्थित केले. तसेच, डिसिसी बँकेतून शेकडो कोटी रुपयांचे कर्ज कोणी घेतले, याचा खुलासा करण्याची मागणी करत चिदानंद सवदी यांनी बँकेचे संस्थापक मुरगोड महांत आज्जनांवर यांचा अवमान केल्याबद्दल जारकीहोळींवर टीकास्त्र सोडले.
रमेश जारकीहोळी यांच्या विधानांचा तीव्र निषेध करत चिदानंद सवदीम्हणाले, सवदी कुटुंबीयांबद्दल अपशब्द बोलण्याचा प्रयत्न केल्यास, आपण देखील जारकीहोळींविरुद्ध अशाचपद्धतीची वक्तव्ये करू. जर मी काही ऐकवले तर रमेश जारकीहोळी यांना दररोज गोळ्यांचा डोस वाढवावा लागेल, असा इशाराही सवदी यांनी दिला.
२०२३ च्या निवडणुकीत, तसेच हुक्केरी आणि डिसिसी बँकेच्या निवडणुकीत जनतेने रमेश जारकीहोळी यांना चोख उत्तर दिले असल्याचे चिदानंद सवदी यांनी नमूद केले. यापुढे जारकीहोळी यांना अथणीत यायचे झाल्यास, त्यांनी ‘काळजीपूर्वक यावे आणि परतावे.’ आपल्या बगलबच्चांसोबत विनामूल्य उपमा-चहा घेऊन निघून जावे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. ‘आमच्या वडिलांबद्दल किंवा आमच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत,’ अशा थेट शब्दांत त्यांनी धमकी दिली.


Recent Comments