





राणी चन्नम्मा यांचा इतिहास ‘गावापासून दिल्लीपर्यंत’ पोहोचवण्याचे काम झाले पाहिजे. म्हैसूर दसऱ्याप्रमाणे काकतीचा कित्तूर उत्सवही भव्यतेने साजरा झाल्यावरच बेळगाव जिल्ह्याला खरी शोभा येईल, असे मत बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

२०१ व्या कित्तूर उत्सवाचा सोहळा राणी चन्नम्मांच्या जन्मगावी काकती येथे अतिशय दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास उत्तर बेळगावचे आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहंमद रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राणी चन्नम्मा यांच्या अश्वारूढ मूर्तीला पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. याच वेळी चन्नम्मांच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस राणीच्या इतिहासातील प्रसंग दर्शविणारी चित्रे जनतेसाठी खुली करण्यात आली.
जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, चन्नम्मांचे जन्मगाव काकती असो किंवा कित्तूर, प्राधिकरणामार्फत निधी वापरून अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच, सार्वजनिक विकासकामेही झाली आहेत. उर्वरित मागण्याही लवकरच पूर्ण केल्या जातील. राणी चन्नम्माजींनी केलेला संघर्ष, युद्ध, त्यांचे त्याग आणि बलिदान आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. आपण त्यांच्या आदर्शांचे पालन केले पाहिजे. म्हैसूर दसरा पाहण्यासाठी लोक येतात, त्याचप्रमाणे काकतीचा उत्सव भव्यतेने साजरा झाला, तरच बेळगाव जिल्ह्याला खरी शोभा येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य यल्लप्पा कोळेकर म्हणाले, ‘आई चन्नम्माचा इतिहास गावापासून दिल्लीपर्यंत ज्ञात आहे.’ त्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या धर्तीवर आई चन्नम्माच्या जन्मगावी किल्ला बांधण्याची विनंती केली. तसेच, त्यांनी संगोळी रायण्णा, आमटूर बाळप्पा यांच्यासह इतर ऐतिहासिक पुरुषांचेही स्मरण केले.
माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धगौडा सुणगार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या वेळी राणी चन्नम्माच्या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा विकास आणि देसाई गल्लीत स्वागत कमान बांधण्याची मागणी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली होती. ही मागणी मंत्र्यांनी पूर्ण केल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, बेळगाव शहराच्या धर्तीवर काकती गावाचा ‘स्मार्ट सिटी’ प्रमाणे विकास करण्याच्या मंत्र्यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली.
व्याख्याते राजू पाटील यांनी राणी चन्नम्मा यांची देशभक्ती, शौर्य आणि पराक्रम याबद्दल माहिती दिली. राणी चन्नम्मा यांचा त्याग, शौर्य आणि बलिदान संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. जगात सर्वाधिक सम्राज्ञी कर्नाटकात होऊन गेल्या. ‘आई चन्नम्मा संपूर्ण महिलावर्गासाठी आदर्श आहेत,’ असे त्यांनी नमूद केले.
त्याचप्रमाणे, पंचायत राज विभाग आणि कित्तूर विकास प्राधिकरण अधिनियम योजनेअंतर्गत जिल्हा पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून काकती किल्ला रस्ते डांबरीकरण आणि महाद्वारांच्या बांधकाम कामांनाही प्रारंभ करण्यात आला.
काकती ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुच्चंडिकर, उपाध्यक्षा रेणुका कोळी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सागर पिंगट यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Recent Comments