निपाणी शहर तसेच संपूर्ण तालुक्यात सरकारी कार्यालयांसह प्रत्येक गावात कर्नाटक राज्योत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली.

निपाणी नगरपरिषदेत झालेल्या पूर्वतयारी बैठकीत बोलताना त्यांनी सर्व कन्नड समर्थक संघटना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून हा राज्योत्सव सन्मानाने साजरा करावा, असे निर्देश दिले. या बैठकीत राज्योत्सवाच्या दिवशी व्यासपीठ, आसन व्यवस्था, नाडगीत, ध्वजारोहण, कुंभमेळा, प्रवेशद्वार, पुरस्कार प्रमाणपत्रे, कन्नड झेंडे व शाल तसेच विविध कलापथके आणि देखाव्यांसंदर्भात अनेक कामांचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी तहसीलदार मुझफ्फर बळीगार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी, नगराध्यक्षा सोनल कोठाडिया, पौरायुक्त्त गणपती पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले.
विशेष म्हणजे, कन्नड समर्थक संघटनांनी कन्नड भवन निर्माण करण्याची, तसेच साठ टक्के नामफलकांवर कन्नड भाषेची सक्ती करण्यासाठी शासनाचे आदेश काटेकोरपणे लागू करण्याची मागणी केली. पूर्वतयारी बैठकीस उपनगराध्यक्ष संतोष संगोवकर, बीईओ महादेवी नाईक, करवेचे अध्यक्ष कपिल कमते, क.सा.प. अध्यक्ष ईरन्ना शिरगावी, शरण आणि बाल साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिथुन अंकली, कन्नड संघटनेचे सदस्य अनिल नेष्टी, सचिन कांबळे, लोकसाहित्य परिषदेचे अध्यक्ष शिवानंद पुराणिकमठ, गडिनाडू कन्नड संघाचे अध्यक्ष महादेव बारगाळे, मारुती कोन्नूर, महादेव गोकार यांच्यासह सर्व कन्नड संघाचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments