Belagavi

चव्हाट गल्लीत म्हशी पळवण्याच्या २८० वर्षांच्या परंपरेचा उत्साह

Share

दिवाळी पाडव्याच्या शुभप्रसंगी बेळगावमध्ये परंपरेनुसार साजरा होणारा म्हशी पळविण्याचा सोहळा यंदाही रंगतदार पद्धतीनं साजरा झाला. दिवाळी पाडव्याला शेतकरी आपल्या घरच्या म्हशी न्हाऊ माखू घालून त्यांना सजवून घेऊन येतात आणि मग गाडी मागून ह्या म्हशी पळवल्या जातात काय आहे ही परंपरा पाहा या रिपोर्टमधून…

हलगीचा गजर, म्हशीच्या शिंगांवर चढवलेले मोरपीस, पायात वाजणाऱ्या घुंगरांचा ठेका आणि चमकणारे चांदीचे तोडे अशा थाटात नटलेल्या म्हशींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मोटरसायकलमधून येणाऱ्या आवाजामागं म्हशी पळवत तरुणांनी आपली कला आणि कौशल्यं दाखवली. काही मालकांनी आपल्या म्हशींना दोन पायांवर उभं करत शहरातील अनेक देवस्थानांसमोर नतमस्तक केलं. आपली जनावरं वर्षभर आपल्यासाठी श्रम करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसंच मालकाचं जनावराप्रती असणारं प्रेम आणि जनावराचं मालकाप्रती असणारं प्रेम दाखवण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.

बेळगाव शहरातील चव्हाट गल्लीत दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या म्हशी पळवण्याच्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे पारणे फिटले. बेळगावच्या चव्हाट गल्लीत सुमारे २८० वर्षांपासून दिवाळी पाडव्याला म्हशी पळवण्याची ही परंपरा पाळली जात आहे. गवळी, मराठा, लिंगायत यांसह विविध समाज यात सहभागी होतात. बेळगाव शहर आणि परिसरातून तसेच कोल्हापूर, मिरज आणि इतर ठिकाणांहूनही म्हशी मालक यात सहभाग घेतात. या अनोख्या परंपरेबद्दल उत्तम नाकाडी यांच्याकडून जाणून घेऊयात अधिक माहिती…

याचप्रमाणे बेळगावमधील या अनोख्या परंपरेबद्दल बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चव्हाट गल्लीत दिवाळी पाडव्याला म्हशींना पळविण्याची परंपरा पार पाडली आहे. वर्षभर शेतकऱ्याला साथ देणाऱ्या म्हशींना दिवाळीत सजवून, त्यांचा मान राखण्यासाठी ही परंपरा जपली जाते असे त्यांनी सांगितले.

गवळी गल्ली, कोनवाळ गल्ली, पांगुळ गल्ली यासह अनेक ठिकाणच्या गवळी बांधवांनी आपल्या म्हशींना शहरातील अनेक रस्त्यांवरून पळवत हि परंपरा साजरी केली. म्हशींचा थाट-माट पाहण्यासाठी आणि या परंपरेचा आनंद पाहण्यासाठी बेळगावकरांनी गल्लोगल्ली उपस्थिती दर्शविली.

Tags: