Belagavi

परवानगी मिळो वा न मिळो, मूक मोर्चा निघणारच.. ता. म. ए. समिती बैठकीत निर्धार

Share

परवानगी मिळो वा न मिळो, दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगावमध्ये १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली निश्चित ठिकाणी मराठी भाषिकांकडून ‘मूक मोर्चा’ काढून ‘काळा दिवस’ पाळण्यात येईल, असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले.

बेळगाव मधील मराठा मंदिरमध्ये तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने काळा दिन आचरणासंदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी म. ए. समितीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली की, बेळगावमधील सद्यस्थिती बाहेरील कन्नड भाषिक लोक प्रक्षोभक भाषणे देऊन बिघडवत आहेत, परंतु पोलीस प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नाही. येथील स्थानिक कन्नड आणि मराठी भाषिक सलोख्याने राहत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

या बैठकीत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये या विषयांवर चर्चा व विचारविनिमय झाला. बैठकीचे अध्यक्षस्थान माजी आमदार मनोहर किणेकर यांनी भूषविले होते.

पोलीस विभागाकडून परवानगी मिळो वा न मिळो, दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात १ नोव्हेंबरला ‘काळा दिन’ पाळणारच. यात मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. केंद्राच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरून ‘मूक मोर्चा’ काढण्यात येईल, असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, ॲड. एम. जी. पाटील, दीपक पावशे, सुनील अष्टेकर, संजय मोरे, डी. बी. पाटील, लक्ष्मण होणगेकर, नारायण सांगावकर, मनोहर उंदरे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: