kitturu

मुख्यमंत्री कित्तूर उत्सवात सहभागी झाले तरी खुर्ची जात नाही

Share

कित्तूर उत्सवाचे यंदाही अत्यंत दिमाखात आयोजन करण्यात येईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे देखील या उत्सवात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री कित्तूर उत्सवाला आले तर आपले पद गमावत , ही अफवा पूर्णपणे खोटी आहे. ही केवळ प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली गोष्ट असून सिद्धरामय्या हे आजही मुख्यमंत्रिपदावर कायम आहेत, असे कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

आज कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आणि पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी कित्तूरला भेट देऊन उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. त्यानंतर कित्तूर उत्सव २०२५ च्या भित्तिपत्रांचे प्रकाशन करण्यात आले.

यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, यावर्षीही गेल्या वर्षीप्रमाणेच कित्तूर उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. समारोपीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या नक्कीच उपस्थित राहतील. उद्घाटनासाठी महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा, कामगार मंत्री संतोष लाड आणि कन्नड व संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी हे उपस्थित राहणार आहेत. “मागच्या वेळीही मुख्यमंत्री उत्सवासाठी आले होते आणि ते आजही सत्तेत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आले तर त्यांचे पद जाते, ही माध्यमांनी निर्माण केलेली चर्चा आहे. याठिकाणी कोणता मुख्यमंत्री कायमस्वरूपी राहिलेला आहे, हे मला सांगा,” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पुढे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माहिती दिली. २३ तारखेला प्रसिद्ध गायिका अनुराधा भट, २४ तारखेला सारेगमप चमू आणि २५ तारखेला बॉलिवूड गायिका नीती मोहन यांचा कार्यक्रम होणार असून स्थानिक आणि राज्यातील कलाकारांनाही संधी देण्यात आली आहे. दररोज साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच, यंदाही भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सरकारने यापूर्वीच ४.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यावर्षी हवाई प्रदर्शन आयोजित करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासन जनतेच्या सूचना स्वीकारण्यास तयार असून, सर्वांनी एकत्र येऊन हा कित्तूर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करूया, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी झाले होते.

Tags: