चिक्कोडी मधील अंकली फाटा ते चिक्कोडी बसव सर्कलपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी ४.८४ कोटी रुपयांच्या भरपाईस मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी दिली.

चिक्कोडी शहरात ७ कोटी रुपयांच्या निधीतून गुरुवार पेठ रस्ता आणि पथदिव्यांच्या लोकार्पणानंतर ते बोलत होते. काही वर्षांपूर्वी चिक्कोडीच्या नागरिकांच्या मागणीनुसार, आम्ही गुरुवार पेठ रस्त्याचे रुंदीकरण आणि भूमिगत वीज तारांचे काम पूर्ण केले आहे. तसेच, सर्व व्यापारी आणि नागरिकांना भरपाई देखील दिली आहे.
त्यानंतर आता बसव सर्कल ते अंकली फाटापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण काम हाती घेण्यात येणार आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ जास्त असल्यामुळे, या रस्त्यावर घरे आणि दुकाने असलेल्या नागरिकांना भरपाई देण्यासाठी ४.८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गरज पडल्यास आमदार गणेश हुक्केरी यांच्या ५० कोटी रुपयांच्या विशेष निधीचाही वापर केला जाईल. सर्व नागरिक, व्यापारी आणि सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार गणेश हुक्केरी म्हणाले की, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रुंद करण्यात आला असून, ७ कोटींच्या निधीतून पथदिवे बसवण्यात आले आहेत. यामुळे गुरुवार पेठेतील व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढेल आणि व्यापारी तसेच ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध होईल.
नवीन अंकली फाटा ते बसव सर्कलपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सर्वांनी सहकार्य करावे. चिक्कोडी जिल्हा करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यासाठी सर्व मूलभूत सुविधा आणि कार्यालये आणली जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी नगरपालिकेचे उपाध्यक्ष इरफान बेपारी, सदस्य गुलाब हुसेन बागवान, साबिर जमादार, अनिल माने, रामा माने, माजी नगराध्यक्ष संजय कवटगीमठ, संतोष जुगुळे, संतोष टवळे, वर्धमान सडलगे, बाबू मिर्जे, सुभाष कवलापूर, रवींद्र हंपनवर, रवी हंपनवर, मुख्याधिकारी जगदीश ईटी, अशोक हंपनवर, प्रकाश वंटमुते, रवी माळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments