हुक्केरी वीज सहकारी संस्था आणि बेळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुका आता संपल्या आहेत. आता जिल्हाभर आणि राज्यभर दौरा करून विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

हुक्केरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, माजी खासदार रमेश कत्ती यांनी वाल्मीकी समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे. याकडे पोलीस विभाग आणि समाजाने लक्ष द्यावे. माझ्याबद्दल केलेल्या वैयक्तिक टीकेबाबत बोलायचे झाल्यास, दिवाळीचा सण संपू द्या, त्यानंतर यावर निर्णय घेईन, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अंकुश लावला जात नाहीये. सरकारी जागांमध्ये कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे, असे कळवण्यात आले आहे. हा नियम केवळ आरएसएससाठी नाही, तर तो सर्व संघटनांना लागू होतो, असे त्यांनी सांगितले.
बिहार निवडणुकीसाठी मंत्र्यांकडून पैसे जात आहेत, या भाजपच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, भाजपचे सर्वच म्हणणे खरे नसते. भाजपचे लोक खोटे बोलण्यात आघाडीवर आहेत. त्यांच्या आरोपांना किंवा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आत्ताच निवडणूक संपली आहे. बीडीसीसी बँकेवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यासाठी १३ संचालक एकत्र बसून, ज्येष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतील. बेळगाव डीसीसी बँकेतील नामनिर्देशित जागेसाठी कुरुब समाजातील एका सक्रिय व्यक्तीला संधी देण्यावर चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सामान्य मतदारसंघातही जारकीहोळी कुटुंबातील सदस्यच निवडणूक लढवत आहेत, या रमेश कत्ती यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, आम्ही स्वतःहून कोणत्याही मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवलेली नाही. कोणत्या मतदारसंघात कोणी उभे राहायचे, याचा निर्णय पक्ष घेतो. पक्षाने तिकीट दिल्यामुळेच आम्ही निवडणुकीला उभे राहिलो आहोत, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments