
शिक्षण क्षेत्रातील साधकांना ओळखून त्यांना समाजात सन्मान मिळवून देण्याचे दिवगंत नागप्पा मिसाळे प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे, असे मत बेळगाव राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी व्यक्त केले.

मारीहाळ गावात मिसाळे प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या जीवन गौरव पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रमेश मिसाळे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. डॉ. डी. एन. मिसाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल प्रास्ताविक केले. याप्रसंगी व्यासपीठावर विष्णुपंत मिसाळे, कृष्णा मिसाळे, गोविंद मिसाळे, प्रणिल मिसाळे, आनंद मिसाळे, डॉ. अजय दळवी, विजय दळवी हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे म्हणाले, शिक्षकांनी केवळ अक्षरे शिकवणारे न राहता, विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची प्रेरणा निर्माण करणारे शिक्षक व्हावे. आपल्या जीवनात प्रकाश आणणारे गुरु हे नेहमीच पूजनीय असतात. या गुरुपदाची बरोबरी जगात कशाशीही होऊ शकत नाही. पुरस्कारासाठी शिक्षकांनी धडपडण्याऐवजी, पुरस्कारांनीच शिक्षकांना शोधून काढले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गोव्यातील साकळी येथील सरकारी महाविद्यालयाचे निवृत्त उप-प्राचार्य डॉ. कृष्णा बडीगेर यांनीही आपले विचार मांडले. जगातील बहुतांश यशस्वी व्यक्तींमध्ये शिक्षकांचेच योगदान आढळते. मजबूत राष्ट्रनिर्मिती केवळ परिपूर्ण आणि श्रेष्ठ शिक्षकांमुळेच शक्य आहे, असे त्यांनी म्हटले. दिवंगत नागप्पा मिसाळे हे अशाच श्रेष्ठ गुरुंपैकी एक होते, ज्यांनी समाजाला ज्ञानाने उजळले, असे सांगून त्यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.
यावेळी डॉ. गजानन नायक, यांनी शिक्षकांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले. या सोहळ्यात प्रभुनगर येथील शुभा भट, वडगाव येथील सुशीला गुरव, जनेवाडी येथील खंडू पाटील, बेळगाव येथील कविता परमाणिक आणि गौंडवाड येथील गजानन धामणेकर या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रायोजक आनंद मिसाळे, सिद्धार्थ मिसाळे, सिद्धेश मिसाळे, सरोजा दळवी, शामला दळवी, विजय दळवी, अजय दळवी यांच्यासह अनेक शिक्षणप्रेमींनी या समारंभाला उपस्थिती लावली. राजेश सोगली आणि गोविंद मिसाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सिद्धार्थ मिसाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Recent Comments