बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लक्ष्मी टेक पंप हाऊसचे गेट बंद करून व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले.

ऐन सणासुदीच्या काळातही वेळेवर वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ आणि दर महिन्याच्या वेतनातील कपातीचा निषेध करत आज बेळगावमधील लक्ष्मी टेक पंप हाऊसचे गेट बंद करून व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
सुमारे २७ वर्षांपासून सेवा देत असलेल्या व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांना कोणतीही सेवासुरक्षा आणि कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यांना दर महिन्याला मासिक वेतन वेळेवर दिले जात नाही. महापौर आणि जिल्हा पालकमंत्र्यांना विनंती करूनही काहीच फायदा झाला नाही. आता दिवाळी सणाच्या वेळीही वेतन नसल्यामुळे हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. अशी माहिती व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांनी दिली.
दलित नेते मल्लेश चौगुले यांनी आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. “व्हॉल्व्हमन कर्मचारी दररोज काम करतात, परंतु त्यांना योग्य सोयीसुविधा आणि वेतन मिळत नाही. हताश होऊन त्यांनी सणाच्या काळात जनतेला त्रास होऊ नये म्हणून प्रतिकात्मक आंदोलन केले आहे. महानगरपालिका आणि अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत वेतन मिळेल, अशी व्यवस्था करावी,” असे त्यांनी म्हटले.
या संदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली. जलमंडळाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरण झाल्यावर हे काम दुसऱ्या एजन्सीकडे देण्यात आले आहे. एल अँड टी एजन्सी मार्फत वेतन दिले जात आहे. मात्र, या वेळी व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांची कागदपत्रे घेऊन प्रक्रिया सुरू असल्यामुळे वेतनात विलंब झाला आहे. आज सायंकाळपर्यंत वेतन दिले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावर महानगरपालिकेच्या मुख्य अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांनी स्पष्टीकरण दिले. वेतन कपातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपेक्स एजन्सी कडून वेतन देण्यास विलंब झाला आहे. “या महिन्याचे वेतन आज पंधरावेळा जाईल आणि यापुढे वेतनात विलंब होणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.
त्यानंतर व्हॉल्व्हमन कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.


Recent Comments