Belagavi

सीमावादांसंदर्भात मंत्री एच. के. पाटील यांचे पुन्हा संतापजनक वक्तव्य

Share

सीमावाद हा आता संपुष्टात आलेला विषय आहे. महाजन अहवाल मान्य झाल्यावर पुन्हा वादाची गरज काय? एकतर महाजन अहवाल मान्य करा किंवा आहे ती यथास्थिती ठेवा. कर्नाटक राज्याचा सध्या सुवर्ण महोत्सव सुरू असून, या वेळी पुन्हा सीमावाद उकरून काढणाऱ्यांना सुबुद्धी मिळो, असे संतापजनक वक्तव्य सीमा आणि कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी केले.

बेळगावातील एस.जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या शिवकुमार संबरगीमठ सभागृहात आज धारवाडच्या कर्नाटक विद्यावर्धक संघ, बेंगळुरूमधील कर्नाटक सीमा प्रदेश विकास प्राधिकरण आणि नागनूर रुद्राक्षीमठाच्या सहकार्याने सीमाभागात कन्नड जनजागृती आणि सांस्कृतिक उत्सव आयोजित करण्यात आला होता. गदग-डंबळ येथील श्री तोन्टद जगद्गुरु डॉ. सिद्धराम महास्वामीजी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभाचे उद्घाटन कायदा आणि संसदीय मंत्री एच. के. पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

राज्योत्सव हा कर्नाटकातील प्रत्येक नागरिकाचा भव्य उत्सव आहे. कोणत्याही भाषिक समुदायाचे असले तरी, जर ते कर्नाटकाचे नागरिक असतील, तर त्यांनी हा उत्सव दिमाखात साजरा केला पाहिजे. हा केवळ कन्नड भाषेचा उत्सव नसून, तो कर्नाटकाचा उत्सव आहे. त्यामुळे सर्व भाषिक समुदायांनी अत्यंत अभिमानाने आणि आनंदाने यात सहभागी होणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळ आणि केरळमध्येही राज्योत्सव होतात, पण तेथे कानडी नागरिक कधीही आक्षेप घेत नाहीत. सीमावादाबद्दल विचार मांडण्यासाठी योग्य व्यासपीठे उपलब्ध आहेत. “कर्नाटकात सीमावाद हा आता संपुष्टात आलेला विषय आहे. महाजन अहवाल मान्य झाल्यावर पुन्हा वादाची गरज काय? एकतर महाजन अहवाल मान्य करा किंवा आहे ती यथास्थिती ठेवा. कर्नाटक आता सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे, या वेळी पुन्हा सीमावाद उकरून काढणाऱ्यांना सुबुद्धी मिळो,” असे त्यांनी म्हटले.

मंत्री एच. के. पाटील पुढे म्हणाले, आवश्यक असलेल्या १० ठिकाणी १ नोव्हेंबरपूर्वी कन्नड शाळांना सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच, जिथे गरज आहे तिथे अंगणवाड्या सुरू करण्यासाठीही सरकारचे लक्ष वेधण्यात येईल. कन्नड मनाच्या मागणीनुसार सीमाभागाचे रक्षण, भाषा आणि संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी सरकार नेहमी सज्ज आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी व्यासपीठावर खासदार जगदीश शेट्टर, उत्तरचे आमदार आसिफ सेठ, डॉ. सरजू काटकर, सोमण्णा बेविनमरद, के.एच. चन्नूर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रकाश मत्तिहळ्ळी आणि शंकर हलगेट्टी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Tags: