Belagavi

‘प्रियांक खर्गे अपरिपक्व…’; त्यांच्यामुळे सिद्धरामय्या आणि काँग्रेस दोन्ही ‘नष्ट’ होतील: खासदार जगदीश शेट्टर

Share

आरएसएसवर बंदी घालणे काँग्रेस सरकारला कधीही शक्य नाही. मराठी आणि कन्नड या दोन्ही भारताच्या भाषा आहेत. त्यांच्यात संघर्ष नको. चूक करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, पण ‘काळा दिवस’ पाळणे योग्य नाही, असे मत खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मराठी आणि कन्नड या दोन्ही भारताच्या भाषा आहेत, त्यांच्यात संघर्ष नसावा. चूक करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई व्हावी, पण काळा दिवस पाळू नये. मराठी भाषिकांनीही राज्योत्सवात सहभागी व्हावे. भाषावादामुळे बेळगावचे नाव बदनाम होत आहे, तसेच बेळगावचा विकास खुंटत आहे. सीमावादाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. काही लोकांच्या कृत्यांमुळे संपूर्ण समाजाला त्रास नको, असे ते म्हणाले.

कणेरी मठाच्या श्रींच्या वक्तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, कणेरी मठाच्या श्रींची भाषाशैलीच तशी आहे. जर त्यांचे बोलणे चुकीचे असेल, तर त्यांच्यावर कारवाई करा. त्याऐवजी त्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी घालणे म्हणजे हा तुघलकी दरबार आहे.

आरएसएसवर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या धोरणावर बोलताना ते म्हणाले, काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आरएसएसला कोणतीही अडचण नाही. उलट आरएसएसची लोकप्रियता लोकांमध्ये वाढत आहे. मंत्री प्रियांक खर्गे हा अपरिपक्व आहे, त्याचे बोलणे ऐकले तर सिद्धरामय्या आणि काँग्रेस हे दोन्ही नष्ट होतील. हे सर्व पाहता, काँग्रेसचा अंतिम काळ जवळ आला आहे, असे वाटते. आरएसएस ही संविधानानुसार काम करणारी संस्था आहे. तिला बॅन करण्याचा अधिकार काँग्रेस सरकारला नाही अशी प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली.

Tags: