
शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत पोलीस दलाने धडक मोहीम राबवत मटका जुगार, अवैध दारू विक्री आणि गांजा सेवन करणाऱ्यांविरुद्ध चार स्वतंत्र ठिकाणी छापे टाकत एकूण ७ आरोपींना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंजर गल्ली परिसरात मोहम्मदशफी तहशीलदार, जावेद तहशीलदार आणि जुबेर जिरगा हे तिघे ‘कल्याण मटका’ जुगार खेळवत असताना पकडले गेले. त्यांच्याकडून ₹७,२५०/- रोख रक्कम जप्त करण्यात आली. दुसऱ्या घटनेत, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देसूर गावात अनिलकुमार भजंत्री हा आरोपी मटका जुगार खेळवताना आढळून आला. त्याच्याकडून ₹१,७५०/- रोख रक्कम जप्त करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध केपी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टिळकवाडी पोलिसांनी मंगळवार पेठेतील गवळी गल्ली येथे अनिल भवानी आणि आकाश भवानी यांच्या घरावर अवैध दारू प्रकरणी छापा टाकला. हे दोघेही कोणत्याही परवान्याशिवाय अवैध दारूची विक्री करत होते. त्यांच्याकडून ₹३,८४०/- किमतीचे ९० एमएलचे ९६ ‘बंगळूर व्हिस्की’ पाऊच जप्त करण्यात आले. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृषी कॉलनी सार्वजनिक रस्त्यावर संदीप नीलनूर हा आरोपी गांजा नावाचे मादक द्रव्य सेवन करताना आढळला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण चार प्रकरणांमध्ये सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ₹१२,८४०/- रोख रक्कम, जुगाराच्या चिठ्ठ्या आणि अवैध दारूचे पाऊच जप्त करण्यात आले आहेत. ही प्रभावी कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी टिळकवाडी, मार्केट आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पीआय, पीएसआय आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments