निरंतर संघर्षानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अखेर सुटकेचा श्वास घेता आला आहे. धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांनी कलघटगी भागातील शेतकऱ्यांसोबत ऊस वाहतूक दराच्या निश्चितीबाबत बैठक घेतली.

धारवाड जिल्हाधिकारी सभागृहात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. कलघटगी-आळणावर भागात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचे संकट दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्देश दिले.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी कलघटगीचे तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांना जिल्हा पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ऊसतोडणीचा दर शासनाच्या नियमांनुसार घ्यावा. नियमांनुसार दर आकारला जात नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्याचप्रमाणे पॅरी शुगर कारखान्यानेही नियमांनुसारच पैसे घ्यावेत, असे त्या म्हणाल्या.
इतर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊ नये याची खबरदारी घ्यावी. ऊस आणि ऊस वाहतुकीसाठी न्याय्य दर देण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या. या बैठकीला उपविभागीय अधिकारी शालम हुसेन, अन्न विभागाचे सहसंचालक डॉ. विनोद हेगळगी, कलघटगीचे तहसीलदार बसवेश्वर होंकणदवर, तसेच शेतकरी नेते महेश बेळगावकर, उलवप्पा बडिगेर, वसंत लकप्पनवर, परशुराम येत्तिनगुड्डा, शिवू तडस, बसनगौडा सिद्दनगौडर यांच्यासह इतर शेतकरी प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments