दोन हत्या, एक हत्येचा प्रयत्न असे एकूण बारा गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर आत्मसंरक्षणार्थ गोळीबार करत पोलिसांनी त्या गुन्हेगाराला कायमस्वरूपी शांत केले.

नुकत्याच विजापूर जिल्ह्यात घडलेल्या गुन्हेगारी घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. विशेषतः बँक दरोडे आणि खुनाच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. आता मात्र पोलिसांनी आपली पिस्तुल सरसावून गुन्हेगारी जगताला थेट इशारा दिला आहे. विजापूर पोलिसांच्या गोळीबारात सराईत मारेकरी युनूस इक्लास पटेल (३५) ठार झाला आहे.
विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील रामपूर गावाबाहेर ही घटना घडली. विजापूर शहर गांधीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनूसने काल एका व्यक्तीला चाकू दाखवून २५ हजार रुपये लुटले होते. त्यानंतर त्याची स्कुटीही चोरून तो फरार झाला होता. याप्रकरणी गांधीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी युनूस त्याच्या मूळ गाव आलमैल तालुक्यातील देवणगाव कडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सिंदगी तालुक्यातील रामपूरजवळ पोलिसांनी आरोपी युनूसला अटक करण्याचा प्रयत्न केला असता, युनूसने पोलिसांवर चाकूने हल्ला केला. यात त्याने दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी इन्स्पेक्टर प्रदीप तळकेरी तोल जाऊन खाली पडले. त्यांनी तातडीने हवेत गोळीबार करून युनूसला इशारा दिला, तरीही युनूस शरण आला नाही. अखेर इन्स्पेक्टर प्रदीप तळकेरी यांनी आत्मसंरक्षणासाठी आरोपी युनूसच्या पायावर गोळी झाडली.
आरोपीच्या पायाला गोळी लागल्याचे कळताच पोलिसांनी त्याला सिंदगी तालुका रुग्णालयात प्राथमिक उपचार दिले आणि नंतर जिल्हा रुग्णालयात हलवले. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आरोपी युनूसला मृत घोषित केले. मृत आरोपी युनूसवर एकूण १२ गुन्हे दाखल होते, ज्यात २ खुनाचे, १ हत्येचा प्रयत्न, दरोडा, रोड रॉबरी, चोरी आणि गांजा तस्करीचे गुन्हे समाविष्ट होते.
२०१७ मध्ये त्याने एका वृद्ध व्यक्तीला बाईकने धडक देऊन आणि नंतर टाइल्सने मारहाण करून हत्या केली होती. २०१८ मध्ये एका तरुणाच्या पोटात चाकू खुपसला होता. १२ मार्च २०१८ रोजीही पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला होता, पण तो वाचला होता. अलीकडेच त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्ये सुरू केली होती आणि लोकांना धमकावून पैशांची वसुली व दरोडे टाकत होता. यामुळे त्याच्यावर १२ गुन्हे दाखल झाले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती विजापूरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.
एकंदरीत, विजापूर पोलिसांनी आपल्या पिस्तुलातून गुन्हेगारांना उत्तर देऊन, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे.


Recent Comments