Belagavi

कण्हेरीमठाच्या स्वामींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करा

Share

लिंगायत मठाधिपतींचा अवमान केल्याबद्दल कोल्हापूर येथील कण्हेरीमठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांना बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात प्रवेशबंदी करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी लिंगायत समाजाच्या संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

शुक्रवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या समस्त लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने, लिंगायत मठाधिपतींचा अवमान केल्याबद्दल कण्हेरीमठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.

बिल्लूर मठात आयोजित एका कार्यक्रमात कोल्हापूरच्या कण्हेरीमठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी बसव संस्कृती अभियान यावर अवमानकारक टीका केली. त्यांनी या अभियानाचा उल्लेख ‘मुख्यमंत्री पुरस्कृत नाटक’ असा केला. तसेच, त्यांनी लिंगायत मठाधिपतींना अर्वाच्च शब्दांचा वापर करून त्यांची निंदा केली. त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यापूर्वी त्यांना विजापूरमध्ये प्रवेशबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, त्याचप्रमाणे बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात त्यांच्या प्रवेशावर निर्बंध घालावेत, संत होऊन असे बोलणे योग्य नाही, असे मत जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष बसवराज रोटी यांनी व्यक्त केले.

एका उपासक महिलेने सांगितले कि, “बसव संस्कृती उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्याचा यशस्वीपणा आणि लिंगायत समाजाची एकजूट कण्हेरीमठाच्या श्री यांना सहन झाली नाही आणि त्यांनी अवमान केला. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.”

आणखी एका व्यक्तीने म्हटले कि “कण्हेरीमठाच्या स्वामींनी, स्वतः संत असूनही सुमारे चारशे मठाधिपतींना शिवीगाळ करणे निंदनीय आहे. काडसिद्धेश्वर हे वचनकार आहेत आणि त्यांचे ५०० वचन आहेत, त्यांनी त्यांचा अभ्यास करावा.”

बैलहोंगल तालुक्यातील नागनूर येथील लिंगायत समाजाच्या लोकांनीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.

यावेळी बोलताना बाबागौडा शिवनईकर यांनी कण्हेरीमठाच्या श्री यांनी अश्लील शब्दांचा वापर करून निंदा करणे निषेधार्ह असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले: “लिंगायत समाजासाठी शेकडो संतांनी एकत्र येऊन अधिवेशन घेतले आहे. आपणही लिंगायत समाजाचे असताना अशा प्रकारे निंदा करणे योग्य नाही.”

यावेळी लिंगायत समाज संघाचे पदाधिकारी आणि इतर अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: