Vijayapura

सरकारी ठिकाणी नमाजवर बंदी घाला; आमदार यत्नाळ यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Share

विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून, सरकारी परवानगीशिवाय सार्वजनिक रस्ते आणि सरकारी आवारांमध्ये होणाऱ्या नमाजला त्वरित ब्रेक लावण्याची मागणी केली आहे.

सरकारी जागा आणि सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी सक्तीची करण्याच्या सरकारच्या नुकत्याच आलेल्या मसुद्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा आग्रह धरला आहे. यत्नाळ यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, परवानगीशिवाय रस्त्यांवर आणि सरकारी आवारात नमाज अदा केल्याने वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो, जो भारतीय संविधानाच्या कलम १९ आणि २१ अंतर्गत नागरिकांच्या मुक्त संचार आणि सुरक्षेच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे.

या गंभीर बाबीवर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना तातडीचे आदेश देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून सरकारी कार्यालये किंवा अनुदानित संस्थांमध्ये नमाजसाठी विशेष परवानगी दिली जाणार नाही. तसेच, आमदार यत्नाळ यांनी कर्नाटक पोलीस कायदा आणि वाहतूक नियमांनुसार, सार्जनिक ठिकाणे धार्मिक हेतूंसाठी अनधिकृतपणे वापरण्यास प्रतिबंध करण्यासाठी सरकारने एक स्पष्ट ‘एसओपी’ तयार करावी, जेणेकरून धर्मनिरपेक्षता, कायद्याची समानता आणि सार्वजनिक शिस्त राखली जाईल, असे म्हटले आहे.

Tags: