Dharwad

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आयआयटी विद्यार्थ्यांशी संवाद

Share

धारवाडच्या आयआयटी केंद्रात स्थापन झालेल्या ‘धर्ती बायोनेट्स सेंटर’च्या उद्घाटनासाठी आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आयआयटीमधील जवळपास पाच विद्यार्थ्यांनी निर्मला सीतारामन यांना त्यांचे प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सीतारामन यांनी अत्यंत स्पष्ट उत्तरे दिली. “विद्यार्थ्यांनी विद्यापीठातूनच नोकरीसाठी तयार होऊन बाहेर पडायला हवे. विद्यापीठांनी कौशल्ये शिकवण्याचे काम करावे. केवळ कौशल्येच नव्हे, तर भाषा हेदेखील त्यात महत्त्वाचे आहे. भाषा शिकल्यास तुम्ही कोणत्याही भागात जगू शकता. भाषेसोबत तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे अतिरिक्त कौशल्ये असल्यास अधिक संधी मिळतील,” असे मत त्यांनी व्यक्त केले. “विद्यापीठांनी अधिक अभ्यासक्रम सुरू करावेत. यूजी आणि पीजी पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी तयार असणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

“सरकार आता सीएसआर फंडामार्फत अधिक मदत करण्यासाठी पुढे येत आहे, परंतु आता स्पर्धा वाढली आहे. प्रत्येकाने स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. स्पर्धा ही अत्यंत महत्त्वाची आहे,” असे त्यांनी सांगितले. पुढे डिजिटल प्रगतीवर बोलताना त्यांनी सांगितले, “आम्ही आता ५९ मिनिटांत कर्ज अर्ज मंजूर करत आहोत. डिजिटल माध्यमातून हे शक्य झाले आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय कर्ज दिले जात आहे. कौशल्ये असलेल्या लोकांना सरकार स्वतःच्या गॅरंटीवर कर्ज देत आहे. कोणताही ग्राहक कोणत्याही बँकेतून कर्ज मिळवू शकतो. डिजिटल माध्यमातून आम्ही हे साध्य केले आहे. भारत देश ८७% डिजीटलाइज्ड झाला आहे, तर इतर देशांची प्रगती ६०% पर्यंतच आहे. ओएनडीसीमार्फत कोणत्याही भागातून बसून डिजिटल माध्यमातून व्यापार करणे शक्य होत आहे. ग्रामीण आणि शहरी अशा सर्व ठिकाणी आता डिजिटलायझेशन दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

Tags: