Belagavi

मुख्यमंत्र्यांची डिनर नाही, ‘कलेक्शन पार्टी’! : खास. जगदीश शेट्टर

Share

“नोव्हेंबर मध्ये ‘क्रांती’ नाही, तर ‘भ्रांती’ निर्माण होईल. जर काँग्रेस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली, तर हे सरकार स्वतःचे अस्तित्व गमावून बसेल आणि बहुधा सरकारचे पतन होईल,” असे विधान खासदार जगदीश शेट्टर यांनी केले.

आज बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना, काँग्रेस नेत्यांकडून आर.एस.एस.ला सरकारी जागा वापरण्यास मनाई करण्याच्या वक्तव्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आर.एस.एस. ही राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम वाढवणारी, तसेच हिंदू समाजाला एकत्र आणणारी संघटना आहे. ही संघटना गेली १०० वर्षे सक्रिय आहे. मात्र, दिवसभर संघावर टीका करणे ही काँग्रेस नेत्यांची मानसिकता बनली आहे. देशातील जनतेमध्ये आर.एस.एस.बद्दल चांगली भावना आहे. ही देशभक्त स्वयंसेवकांना जोडणारी संस्था आहे. मी अभिमानाने सांगतो की, मी स्वतः आर.एस.एस.चा स्वयंसेवक आहे.”

शेट्टर पुढे म्हणाले की, “मंत्री प्रियांका खर्गे यांनी राजकीयदृष्ट्या भाजपविरोधात लढण्याऐवजी आर.एस.एस.च्या वाढीचा द्वेष का करावा, हे समजत नाही. आर.एस.एस.च्या संघटनेमुळे त्यांना भीती वाटत आहे आणि म्हणूनच ते संघावर बंदी घालण्यासाठी पुढे सरसावले आहेत. संघावर बंदी घालण्याचा त्यांना कोणता नैतिक अधिकार आहे? पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि पी.व्ही. नरसिंहराव यांनी देखील आर.एस.एस.वरील बंदी मागे घेतली होती. जर सिद्धरामय्या सरकारने बंदी घातली, तर तमिळनाडूमध्ये घडले होते, त्याप्रमाणे न्यायालयाकडून त्यांना फटकारले जाण्याची वेळ येईल.” मंत्री प्रियांका खर्गे हे स्वबळावर निवडून आलेले मंत्री नाहीत. ते त्यांच्या अहंकारामुळे आणि बालिशपणामुळे स्वतःचे व्यक्तिमत्त्व खराब करत आहेत. आर.एस.एस. जे काम करते, ते काँग्रेस सेवा दलाने करून दाखवावे, असे आव्हान जगदीश शेट्टर यांनी यावेळी दिले.

राज्य काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढले आहेत. नोव्हेंबरमधील क्रांतीबद्दल त्यांच्याच नेत्यांनी भाष्य केले आहे. डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होतील, असे काँग्रेसचे कार्यकर्तेच बोलत आहेत. खुद्द डी.के. शिवकुमार यांनीदेखील मुख्यमंत्री पदासाठी ‘हायकमांड’चा निर्णय अंतिम असेल, असे स्पष्ट केले आहे. राज्यात काँग्रेस प्रत्येक बाबतीत अपयशी ठरली आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीही सरकारकडे निधी नाही. गुंतवणूकदार कर्नाटकातून पाठ फिरवत आहेत, अशी प्रतिक्रिया शेट्टर यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की, “आमच्याकडे २०२४ पर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील. बिहार निवडणुकीसाठी ‘हायकमांड’करिता निधी गोळा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे डिनर पार्टी करत आहेत. कर्नाटक हे काँग्रेससाठी ‘एटीएम’ बनले आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये क्रांती नाही, तर केवळ भ्रांती होईल.”

याशिवाय, केंद्र सरकारने बेंगळुरू ते मुंबई ‘वंदे भारत’ सुपरफास्ट रेल्वे सेवा सुरू केली आहे. ही सेवा बेळगावपर्यंत वाढवण्यात यावी, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तसेच, बेळगाव ते हुबळी थेट रेल्वे सेवेसाठी धारवाडमध्ये ६० एकर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. यासाठी १५० कोटी रुपयांचा निधीही मंजूर होणे आवश्यक आहे. लवकरच भूसंपादन करून ६ महिन्यांत या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Tags: