Dharwad

धारवाड-बेळगाव बायपासवर भीषण अपघात; भरधाव क्रुझर झाडाला धडकून दोघांचा मृत्यू

Share

धारवाड-बेळगाव बायपास रस्त्यावर झालेल्या एका भीषण अपघातात क्रुझर गाडी झाडावर आदळून दोघांचा जागीच करुण अंत झाला. देवदर्शन घेऊन बेळगावहून धारवाड राष्ट्रीय महामार्गामार्गे घरी परतणाऱ्या क्रुझर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात मुल्ला ढाब्याजवळ घडला.

धारवाड बाह्यवळण मार्गावरील तेगूरजवळील मुल्ला ढाब्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली. अपघातात ठार झालेले दुर्दैवी प्रवासी गदग येथील रहिवासी सुरेश तुप्पद (५२) आणि महांतम्मा तुप्पद (६५) हे आहेत. सुमारे १० ते १२ लोक क्रुझर वाहनातून कोल्हापूर येथील देवस्थानाचे दर्शन घेऊन परत गदगकडे जात होते. याच वेळी मुल्ला ढाब्याजवळ क्रुझर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य काही प्रवासी जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गरग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे.

Tags: