कागवाड आणि अथणी तालुक्यातील विविध दलित संघटना आणि वकिलांनी एकत्र येत आज सकाळी कागवाड तहसील कार्यालयासमोर सरन्यायाधीशांच्या अवमानाविरोधात आंदोलन केले. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.

भारताच्या संविधानातील तीन महत्त्वाच्या अंगांपैकी न्यायपालिका सर्वोच्च स्थानी आहे; मात्र देशाची न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न मनुवादी तत्वांकडून सातत्याने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकून न्यायपालिकेची पवित्रता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा दुष्ट व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना देशातून हद्दपार करावे, अशी तीव्र मागणी दलित संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक संजय तळवळकर यांनी केली.
यापूर्वी सकाळी शहरातील विश्रामगृहात दलित संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली. जिल्हा संयोजक संजय तळवळकर यांच्या नेतृत्वाखाली, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर आणि ग्वाल्हेरचे वकील अनिल मिश्रा यांनी डॉ. आंबेडकरांविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य, या दोन्ही घटनांवरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विश्रामगृहापासून तहसील कार्यालयापर्यंत मेणबत्ती लावून मोठा मोर्चा काढत हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी अथणी येथील वकील सचिन वाघमोरे, नितीन पत्तन, उमेश मनोगजे, शशिकांत निडोणी, दयानंद भंडारे, विद्याधर धोंडारे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक भाषणे करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
यावेळी प्रकाश धोंडारे, दयानंद भंडारे, महांतेश बडिगेर, मीरा कांबळे, उदय खोडे, रवी कुरणे, विशाल धोंडारे, रवी कांबळे, विजय असोदे, प्रकाश कांबळे, प्रसाद शिंगे, शेखर कुराडे यांच्यासह महिला कार्यकर्त्या आणि हजारो दलित संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य राखण्यासाठी आणि दलित नेत्यांविरुद्धच्या कारवाया थांबवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला
Recent Comments