Belagavi

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला देशातून हद्दपार करा

Share

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याला देशातून हद्दपार करावे, अशी जोरदार मागणी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती आंबेडकर ध्वनी, चंद्रकांत काद्रोळी गटाने केली आहे.

कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती, आंबेडकर ध्वनीच्या चंद्रकांत काद्रोळी गटाने अध्यक्ष श्रीकांत मादर यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर केले.

सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला भारतामधून तडीपार करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अलीकडेच, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी , विष्णूमूर्ती भग्न प्रकरणाचा निकाल देताना न्यायमूर्ती गवई यांनी “हा विषय न्यायालयाशी संबंधित नाही, तुम्ही आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया कडे अर्ज करा,” असा कायदेशीर निर्णय दिला होता. दलित संघर्ष समितीने आरोप केला आहे की, न्यायमूर्तींच्या या न्यायसंगत भूमिकेचा स्वीकार न करता वकील राकेश किशोरने न्यायालयाची प्रतिष्ठा आणि संविधानाचा अवमान केला आहे.

“भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला न मानणारे अनेक देशद्रोही लोक तथ्यहीन विधाने करत आहेत. त्यामुळे, अशा देशद्रोही कृत्ये करणाऱ्यांविरुद्ध प्रत्येक राज्यात त्या-त्या मुख्यमंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत,” असे आवाहन त्यांनी केले. या संदर्भात राष्ट्रपती आणि सन्माननीय पंतप्रधान यांना देखील निवेदन सादर करण्यात आले आहे. कायदा आणि संविधानाचा मान राखणाऱ्या तसेच देशद्रोही कृत्ये खपवून न घेणाऱ्या कठोर उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी संघटनेने यावेळी केली.

यावेळी बसवराज कट्टीमणी, महालिंग गग्गरी, बाळव्वा हरिजन, हणमव्वा मरेण्णवर, लक्ष्मी किळे, नीलव्वा धूळाई, मिलिंद ऐहोळे, चांदबीबी नदाफ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Tags: