Belagavi

काकती ग्रामपंचायत सदस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे सामूहिक राजीनाम्याचा इशारा

Share

बेळगाव तालुक्यातील काकती ग्रामपंचायत सदस्यांनी अवज्ञानिक पद्धतीने वाढवलेली मालमत्ता कर कपात करण्याची मागणी केली आहे. जर निवडलेल्या प्रतिनिधींच्या मागणीचा विचार केला नाही, तर सामूहिक राजीनामा देण्याचा काकती ग्रामपंचायत सदस्यांनी इशारा दिला आहे.

आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काकती ग्रामपंचायत सदस्यांनी जोरदार आंदोलन केले आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.

काकती गाव राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्यामुळे मालमत्ता करात मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे गरीब जनता आणि शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत आहे. ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हणे यांनी इशारा दिला की, “जर ही कर वाढ त्वरित कमी केली नाही, तर आम्ही सर्व सदस्य सामूहिक राजीनामा देऊ.”

काकती गावात मुख्यतः शेतकरी वास्तव्यास आहेत. मात्र, यावेळी सुमारे ५ टक्के कर वाढवण्यात आला आहे. यामुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. “कराची वाढ वैज्ञानिक पद्धतीने केली पाहिजे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचे आंदोलन सतत सुरू राहील,” अशी प्रतिक्रिया अन्य एका सदस्यांनी व्यक्त केली.

यावेळी लक्ष्मण पाटील, बी.टी. टुमरी, बी.जे. हिरेमठ, मारुती कंग्राळकर, मल्लप्पा गोमनाचे, सिद्धप्पा टुमरी, जी.एस. शिवपूजीमठ, महेश रंगायी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

Tags: