Belagavi

जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला; मंत्री हेब्बाळकर समर्थकांचे तीव्र आंदोलन

Share

बेळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी मोठे आंदोलन केले. ‘मत चोरी’च्या विरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या सही संकलन अभियानाच्या फलकावरून मंत्री हेब्बाळकर यांचे छायाचित्र वगळल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

बेळगाव येथील संगोळ्ळी रायण्णा चौकातील काँग्रेस कार्यालयासमोर हेब्बाळकर समर्थक मोठ्या संख्येने जमले. त्यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. या फलकावर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद चन्नराज हट्टीहोळी यांचे छायाचित्र नव्हते. या कृतीमुळे लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी अभियानावर बहिष्कार टाकत थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला.

समर्थकांच्या या तीव्र संतापापुढे झुकत, जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्वरित सदर फलक हटवला. “मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी मोठे योगदान दिले आहे, तरीही अशा महत्त्वाच्या अभियानाच्या फलकावरून त्यांचे छायाचित्र वगळणे अत्यंत क्लेशदायक आहे,” अशा शब्दांत आंदोलकांनी आपली नाराजी व्यक्त केली.

यावेळी समर्थकांनी, फलकावर त्वरित मंत्र्यांचे छायाचित्र लावावे, असा आग्रह धरला. या संपूर्ण घटनेमुळे बेळगाव जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, हा राजकीय तणाव आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.

Tags: