बेळगाव शहरात मादक पदार्थांची विक्री आणि सेवन याविरुद्ध कठोर पाऊल उचलण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. शहरातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. या प्रक्रियेबाबत नागरिकांनी आपले सल्ले आणि सूचना द्याव्यात, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.

बेळगावात मादक पदार्थांची विक्री आणि सेवन याविरुद्ध ठोस भूमिका घेण्यासाठी पोलीस विभागाने जिल्हा प्रशासनासमोर हा महत्त्वाचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमधील १०% विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली जाईल. विद्यार्थी आणि पालकांच्या संमतीशिवाय ही प्रक्रिया करण्याची योजना आहे. रक्त तपासणीतून संबंधित विद्यार्थ्याने मादक पदार्थांचे सेवन केले आहे की नाही, हे स्पष्ट होईल. मात्र, या तपासणीची माहिती गोपनीय ठेवली जाईल. गांजाचे सेवन करणाऱ्यांच्या रक्तात त्याचे अंश सुमारे एक महिना राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच मादक पदार्थांचे सेवन करणे थांबवावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
नागरिक त्यांच्या सूचना बेळगाव सिटी पोलीसच्या वेबसाइटवरील ‘माझ्या बेळगावसाठी माझा सल्ला’ या विभागात देऊ शकतात. सुरुवातीला ही प्रक्रिया केवळ १०% विद्यार्थ्यांसाठी केली जात असली तरी, ९०% अंमलबजावणीसाठी पालकांनी सहकार्य करावे. मादक पदार्थांचे सेवन केले आहे की नाही, हे पालकांनी घरीच तपासण्यासाठी एक विशेष किट उपलब्ध असून, त्याची माहिती वेबसाइटवर सामायिक केली जाईल. या उपाययोजनांमुळे विद्यार्थी मादक पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहू शकतील, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या जवळ मादक पदार्थांची माहिती देण्यासाठी पोलीस विभाग क्यूआर कोड देखील लावणार आहे.


Recent Comments