
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या बेळगावच्या एकाच कुटुंबातील नऊ जण बुडाले असून तीन जणांना जलसमाधी मिळाली आहे. या अपघातात चार जण अद्यापही बेपत्ता असून, एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

समुद्रकिनाऱ्यावर प्रवासासाठी गेलेल्या बेळगावच्या या कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. हा भीषण अपघात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा समुद्रकिनाऱ्यावर घडला. इसरार कित्तूर (१७), इबाद कित्तूर (१३) आणि अळणावर येथील नमीरा अख्तर (१६) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
लोंढा येथील प्रहाना कित्तूर (३४) या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इरफान कित्तूर (३६), इकवान कित्तूर (१५), महाराष्ट्रातील कुडाळ येथील परयान मनियार (२०) आणि झाकीर मनियार (१३) हे चार जण अद्यापही बेपत्ता आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या चौघांचे शोधकार्य सुरू आहे.
दसरा सणाच्या सुट्ट्यांमध्ये ८ सदस्यांचे हे कुटुंब शिरोडा समुद्रकिनाऱ्यावर प्रवासासाठी आले होते. समुद्रामध्ये पोहत असताना अचानक आलेल्या मोठ्या लाटांमुळे ते सर्वजण वाहून गेले. यापैकी प्रहाना कित्तूर (३४) यांना स्थानिक लोकांनी त्वरित धाव घेऊन बचावले.
सिंधुदुर्ग जिल्हा अग्निशमन दल, पोलीस विभाग आणि स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने शोधकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ड्रोन, डायव्हर्स आणि बोटींचा वापर करून शोधमोहीम विस्तारण्यात आली आहे.


Recent Comments