Belagavi

खडक गल्ली परिसरात संदल मिरवणुकीवेळी दगडफेक

Share

मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या आजच्या बेळगाव दौऱ्याच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी रात्री बेळगाव शहरातील खडक गल्लीत दोन गटातील युवकांमध्ये मिरवणूक मार्ग आणि घोषणाबाजीच्या कारणावरून दगडफेकीची घटना झाली.

काकतीवेस परिसरात माबू सुभानी दर्ग्याच्या उरुसचा कार्यक्रम होता. रात्री काकतीवेसहून दरबार गल्लीकडे संदल मिरवणूक जात होती. ऐनवेळेला मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात आला. खडक गल्ली परिसरात येताच घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दगडफेकीची घटना घडली आहे. ऐनवेळेला मिरवणूक मार्ग बदलण्यात आला. मिरवणुकीबरोबर पोलीसही होते. मात्र त्यांची संख्या कमी होती. दगडफेकीत कोणालाही इजा पोहोचली नाही.

या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल असून घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. या घटनेनंतर काकतीवेस, खडक गल्ली, दरबार गल्ली परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शुक्रवारी रात्री स्वतः घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, एका धर्मियांच्या मिरवणुकीवेळी काही तरुणांनी खडक गल्लीत घुसून घोषणाबाजी केली. त्यावेळी दोन्ही धर्मातील प्रमुखांनी ही वादावादी मिटविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दगडफेकीची घटना घडली आहे. दगडफेकीत कोणालाही इजा पोहोचली नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले.

Tags: